पुर्वार्ध
सुमंगल–सुमधुर-उत्साही वातावरण. साधारणसे
गाव-माणसं कुठले तरी. त्या वातावरणात नवोदित जोडपे सात फेऱ्या घेतायंत. जेवणाच्या पंगती
मध्ये रेलचेल चालूये. पाहुणे मंडळी जेवणं उरकतायंत, घरची काही मंडळी आहेर करतायत किंवा
त्यातले काही जेवणाऱ्यांना आग्रह करतायंत आणि ज्यांना काहीच करायचं नाही ते समोर बसून
फक्त ही कितवी फेरी झाली हे मोजातायंत. जे प्रत्येक लग्नात चालत ते इथे पण चालूये.
अगदी बिनबोभट, यांत्रिक हालचाली, नुसार अगदी ठरल्याप्रमाणे. हं अपवाद फक्त एकाच गोष्टीचा.
काही नाही, सप्तपदीच्या प्रत्येक फेरीला एक लहान मुलगा नवऱ्या मुलीच्या सोबतच चालत
होता. एका फेरीला त्याला बाजूला ओढावं तर हा कुठूनसा येऊन दुसऱ्या फेरीला हजर! कोणी
त्याला प्रेमाने समजावे, कोणी रागाने बोलावे पण करत महा डॅम्बीस. कशालाच बधेना. साम-दाम-दंड-भेद
शेवटी त्यानेच निर्णय घेतला, नववधूचा साडी पदर पकडला आणि जिवाच्या आकांताने ओरडला “मी
अक्का ला सोडून कुठेच जाणार नाही”.
फार तर फार ५-६ वर्षांचं पोरगं असेल
ते पण नव्या नवरीचा लहान का होईना भाऊ प्रत्येक सेकंदाला सोबत म्हणजे चर्चेला विषयंच
की हो. बहुतांश जणांना हे लग्न याच एका कारणाने आठवणीत राहील बहुदा. पण त्या लेकराचा
यात काही दोष नाही. त्याच नशीबंच उघड. तो आपल्या जन्मदात्यांना फक्त फोटोतच पाहणार
होता. पैकी आई चा फोटो नाही काढला म्हणे कधीच. हां वडील कोणाकडे तरी कारकुणीस होते
तेव्हा नोकरी निम्मित का होईना त्यांचा फोटो काढला होता फक्त. ब्लॅक अँन्ड व्हाईट चा
तो काळ. सामान्य माणसाकडे अठरा विश्व दारिद्र्य म्हणून गरिबी जन्मतः भेट म्हणून घेऊन
आला होता तो. त्यात तीन बहिणीनं पाठचा एककूलता एक भाऊ हा. त्याच नशीब उघड पण त्याच्या
या अक्का ने मात्र नशीब उघडलं होत. सरकारी नोकरीस तुडवडा नसे त्या काळी म्हणून चांगला
देखणा, तरतरीत राजबिंडा तरुण तिने जोडीदार म्हणून निवडला होता. झालं. सप्तपदी-कानपिळीनी-सुनामुख-विहीन
भोजन अन नवरीला वाटी लावण्याची वेळ पण हे कार्ट काही हटेना. शेवटी त्या तरुणानेच निर्णय
घेतला. त्या पोराविषयी असलेली चीड, दया, कीव त्याला लोकांच्या नजरेत बघवेना बहुदा.
तरुणाने भर मंडपात आपल्या एकुलत्या एक मेव्हण्याला आणि त्याच्या नशिबाला आपल्या कडेवर
उचलून घेतलं.
पोरगं आता मोठं झालं होत. त्याला एक
नाव सुद्धा देण्यात आलं. मिलिंद! अक्काचा मिलिंद. त्याच्या अक्का कडेच वाढला. शिकला.
नोकरीला लागला. नाही नाही . . . लावला. त्यात ही याच तरुणाचा सिहांचा वाट. परीक्षेचा
फॉर्म हि यानेच भरला. पुढे मुलाखतीची तयारी घेतली. पहिल्या पोसिंग ची जागा जवळंच मिलीवि
म्हणून देखील याचाच खटाटोप. धरणग्रस्त म्हणून सरकारी कारकुनास यानेच जागा मिळवून दिली.
पुढे लग्न लावून दिल. कर्म-धर्म संयोगाने दोन पोरं मिलिंदच्या पदरी आली. एवढंच नव्हे
त्या तरुणाने आपल्या बायकोच्या “माझ्या भावासाठी घर पाहणार असाल तरंच आपलं घर बुक करा”
या हट्ट पायी मिलिंदच्या घराची रजिस्ट्री पावती सुद्धा भरली.
दिवस बदलले. ती नववधू आता आमची आत्या
झाली होती आणि तो तरुण आमचे मामा. या सर्व धामधुमीत त्या तरुणाचं काय झालं? त्याच्या
आयुष्यात काय चालू होतं? बरं त्याच नाव तरी काय?
उत्तरार्ध
“शिवनाथ पुरुषोत्तम काळवीट”. सिर्फ
नाम ही काफी है! या नावातच तुम्हाला पूर्वार्धाचा सारांश सापडेल. काळवीट मामा सापडतील.
बालपणी दिवाळीत भाऊबीज किंवा एखाद्या वेळेस राखीपौर्णिमा या दिवशीच आत्या कडे जाणे
व्हायचे. फार-फार तर २-३ दिवस राहायचो. पण ते ही दिवस कसे काटतील असं व्हायचं. कधी-कधी
तर “आत्या कडे जायचं आहे” असं बाबा म्हणाले जरी तरी मला रडू यायचं. का? असं म्हणून
काय विचारतयं? अहो काळवीट मामा म्हणजे साक्षात ‘शिव’! ते समोर दिसत समोरचा माणूस तांडव
करी. नजर तीक्ष्ण, काळजाला भेद देणारी. घरी २४ तास बडदास्त शिस्तेचं वातावरण. मोठ्या
आवाजात बोलण्यास सक्त मनाई. त्यांचा संपूर्ण दिवस कसा आखीव-रेखीव कार्यक्रम. राग तर
असा, की एका नजरेत समोरच्याच काळीज हाती येई. मुळचे घारे डोळे अजून समोरच्या गपगार
करीत. “टेरर का दुसरा नाम काळवीट मामा” असं पालुपद आम्हा आते-मामा भावंडात प्रचलित
असे. खरी सत्वपरीक्षा तर जेवणाच्या पंक्ती ला येई. आम्ही पोरं पण फार टरकून असू की
आज आम्हाला जेवायलाच न मिळो! पण नशीब पार आडवं हो. नेमकं आम्हा पोरांच्या पंक्ती ला
'शिव' 'दत्त' म्हणून उभे! त्यात आमच्या मुंजी झालेल्या. “ज्यांना ज्यांना चित्रवती
घालता येतात त्यांनीच फक्त जेवायला बसा.” पहिला आदेश. “वदनी कवळ घेता म्हणता आले नाही
तर एक घास गिळायचा नाही.” दुसरा आदेश. अश्या आदेशाच्या फैरी चालुच. शिवाय, “लागेल तेवढेच
घ्या. नाहीतर उरलेलं डोक्यावर थापा किंवा तुमच्या माईच्या पदरात बांधा.” अशी बोलणी
होतीच तोंडी लावायला. त्यांची स्वतःची ४ पोरं त्यांच्या समोर यायला घाबरायचे तर आमची
काय कथा! मिळालं उत्तर की का नाही जायचं आत्या कडे? नकोच ते.
पण तरी आम्ही आत्या कडे जायचो. कारण
ती स्वतःच होती. आमच्यासाठी आत्या-मामा म्हणजे उत्तर-दक्षिण ध्रुव. मामा जेवढे कडक
आत्या तेवढी प्रेमळ. भावाची पोरं ही तिला तिच्या नातवंडं प्रमाणेच. तेव्हा काकणभर का
होईना तिची ओंजळ आमच्यासाठी कायम जास्त भलेली असायची. मामांविरुद्ध बंड पुकारण्याचा
अनेकदा प्रयत्न झाला. जस की उलट बोलणे, ना बोलणे, त्याच्या समोरच ना जाणे. परंतु तिर्थरुपांनी
ते सर्व प्रयत्न शब्दशः ‘हाणून’ पाडले. असे हे काळवीट मामा. मला वाटायचे, अरे हा माणूस
असा कसा? याच्या उत्तरादाखल आणि एकदा पूर्वार्ध ऐकवला. गरम शिसाचा रस कानी पडला. परिस्थती
माणसाला आतून किती ओरबाडते ना. रागीट बनवते. कर्मठ बनवते. शिस्तबद्द बनवते. मामांकडे
पाहण्याचा दृष्टीकोन आता काळानुरूप बदलला होता.
खरं तर प्रत्येक कुटुंबाचा आधार म्हणजे
बाप. पण बापाचा पण कोणी आधार असेल तर? जर बाप डोंगर तर डोंगरालाही व्यापणारी असतं आभाळ.
आभाळाएवढा माणूस ‘शिवनाथ पुरुषोत्तम काळवीट’ या नावात तुम्हाला आमचे आभाळ सापडेल.
वर्तमान
काळवीट मामा विषयीची फक्त भीती ची
जागा आता आदरयुक्त भीतीने घेतली. मामांच्या छायेत माझे वडील मोठे झाले. त्याच्या छायेत
मी देखील मोठा झालो. कालांतराने मामांशी संपर्क वाढला. सर्व काही सामान्य आणि तो एक
दिवस काळ रात्र म्हणूनच उगवला. २६ जुलै २००८. आमचे बाबा गेले. पितृशोक. बाबा सरकारी
नोकरदार. त्यांच्या पश्चात आई ला पेंन्शन मिळण्याचा मार्ग अतिशय खडतर. त्यात सरकारी
काम सहा महिने थांब. या सहा महिन्यांचे तीन वर्ष झाली. त्या तीन वर्षात काळवीट मामांनी
त्यांच्या सरकारी नोकरीच्या प्रचंड अनुभवाने यशस्वी रित्या मार्गदर्शकाची धुरा स्वीकारली.
सरकारी कामाची पद्धत, त्यातले पत्रव्यवहार, लिखाणाचा मजकूर, त्यातील शब्दरचना. आपले
म्हणणे मोजक्या शब्दात पण प्रभावीपणे कसे मांडावे ह्या सर्व देणग्या मला त्यांच्याकडूनच.
पण पुढे पुढे फक्त पत्रव्यव्हाराने कामं जमेनाशी झाली. प्रत्यक्ष भेट करावी सरकारी
दरबारी हे नित्याचेच झाले.
औरंगाबाद-परभणी-नांदेड असा त्रिकोणी
प्रवास मामांसोबत अनेकदा केला. हा प्रवास फक्त रेल्वे रूळांवरती सुकर वाटत असे. शहराच्या
एका टोकापासून येऊन पहाटे ४.३० वाजताची गाडी पकडणे म्हणजे खायची गोष्ट नव्हती. बरं
प्रत्येकवेळी तिकीट बुक करण्या इतपत पैसे नसत. मग आमची स्वारी जनरल डब्यात. तोबा गर्दी.
बसायला सोडा उभं राहायला भेटलं तरी नशीब. आई ला लेडीज म्हणून जागा मिळत जाई कधी-कधी.
मी उभा राहणे ठीक एकवेळ. पण मामा? मामानं देखील टॉयलेट रूम च्या मधल्या जागी उभं राहावं
लागे. किती वेळ? 3 तास! सेवानिवृत्त झालेला माणूस!! पुत्रशोक झालेला माणूस!!!
साल २०१५. त्या दिवशी काळजाला छेद
देणारी घटना घडली. अनुकंपा यादीतील माझं नाव वर येईना. मामांनी मला सोबती घेतले. थेट
नांदेड गाठलं. महत प्रयासातून जिल्हाधिकारी साहेबांची भेट ठरली. “साहेब, माझ्या भाच्या
ला तुमच्या पदरी घ्या.” भेटीतले हे पहिले वाक्य मामांचे. हाथ जोडलेले. त्या दिवशी मी
आभाळ झुकताना पहिले. माझ्यासाठी! नातवासाठी!!
संध्याकाळ
वक्त बडा बलवान है भैया! आज तारीख साक्ष आहे. वरील
सर्व घटना लाल फितीत बंद होत्या. पण कोणी कोणासाठी थांबत नाही तसं मला देखील थांबता
आले नाही. नोकरीला लागलो. लग्न झाले. मी मोठा झालो आणि मामा खचत गेले. आजकल मामा आमच्या
घरी चक्कर सुद्धा मारत नाहीत. ऐकलं आहे तोल जातो म्हणे चालायला गेलं की. पण एकेदिवशी
चालत आले. स्वतः आणि बिन आधाराचे. माझं बाळ पाहायला. सोफ्यावर बसले. मी खूप विनवण्या
केल्या पण ते काही त्याला जवळ घेईनात. “अर्रे माझ्या म्हाताऱ्याचे हाथ थरथरतात आता.
पोर सुटेल हो तुझं माझ्या हातून.” “सुटू देत. पण, मामा तुम्ही माझ्या लेकराच्या डोक्यावर
हाथ ठेवा. कारण तुम्ही बाबांच्या डोक्यावर हाथ ठेवलात तर मी इथंवर येऊन पोहोचलो आणि
जर तुम्ही त्याच्या डोक्यावर हाथ ठेवलात तर तो या जगाला गवसणी घालेल.” असं म्हणून १५
दिवसांचा तो गोळा मी त्यांच्या हाती ठेवला.
आज
आत्याच्या घरी पुरणाचा स्वयंपाक. घरी नेहमीप्रमाणे आरत्या-आवर्तने, स्वयंपाकघर घमघमलेलं
आणि बाकी घर जमजमलेलं. पण मामा आता पार थकले आहेत. आज त्यांच्या समोरच जेवलो. त्यांची
स्थित प्रज्ञ नजर माझ्यावर होती असं मानून चित्रावती घातली. वदनी कवळ घेता म्हणालो.
पण मामा, मी माझं पान पूर्ण संपवलं नाही. मी ते माझ्या आई च्या पदराला बांधुन नेण्याच्या
तुमच्या आवाजाची वाट पाहतोय.
-तुमचा पहिला नातू.
-प्रतिक चांदगावकर